जलसंपदा विभागातल्या ४५ अधिकाऱ्याची चौकशी! 45 officers will face enquiry

जलसंपदा विभागातल्या ४५ अधिकाऱ्यांची चौकशी!

जलसंपदा विभागातल्या ४५ अधिकाऱ्यांची चौकशी!
www.24taas.com, नागपूर

सिंचन घोटाळा प्रकरणी जलसंपदा विभागातल्या 45 अधिका-यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विरोधी पक्ष मात्र श्वेतपत्रिकेच्या मागणीवर ठाम आहेत. सिंचन प्रकल्पांच्या किंमती वाढण्यामागे नियम डावलले गेल्याचा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केलीये.

जलसंपदा खात्यातल्या 45 अधिका-यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रकल्पातील गैरव्यवहाराची माहिती पहिल्यांदा समोर आणणा-या वडनेरे समितीच्या शिफारशीनुसार ही चौकशी होणार आहे. जलसंपदा विभागाचे सचिव डी.पी. शिर्के यांच्यासह 45 अधिका-यांची चौकशी होणार आहे. शिर्के यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव म्हणूनही काम पाहिलंय.

मात्र या खातेनिहाय चौकशीचा काही उपयोग होणार नाही. राजकारणी आणि कंत्राटदारांच्या संबंधांची सीबीआय चौकशी केली पाहिजे, असं सांगत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे टार्गेट केलंय.

भाजपा प्रदेश महासचिव देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना लक्ष्य केलंय. नियम डावलून बाजार भावांनं जागा घेतल्यामुळे प्रकल्पांच्या किंमती फुगल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र खातेनिहाय चौकशीत हा मुद्दाच येणार नसल्याचं, तिचा उपयोग नसल्याचं ते म्हणतायत.

मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांचंही समाधान झालं नसल्याचं स्पष्ट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असलेली दरी यामुळे अधिक रुंद झाल्याचं यावरून स्पष्ट होतंय.

First Published: Sunday, October 7, 2012, 20:05


comments powered by Disqus