अण्णा हजारे यांची नवी टीम, Anna Hazare`s New Team

अण्णा हजारे यांची नवी टीम

अण्णा हजारे यांची नवी टीम
www.24taas.com,नवी दिल्ली

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. अरविंद केजरीवाल यांना रामराम केल्यानंतर दोन महिन्यांनी अण्णांनी नवी टीम जाहीर केली.

या टीमचा महिनाभरात विस्तार करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. या टीममध्ये माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश होण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारे यांच्या टीमच्या प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत मात्र व्ही. के. सिंह, सामाजिक कार्यकर्ते पी. व्ही. राजगोपाल, जलसंधारण क्षेत्रातील कार्यकर्ते राजेंद्रसिंह, तसेच शेतीतज्ज्ञ देवेंद्र शर्मा अशा मोठ्या नावांचा समावेश नाही.

अण्णा हजारे यांनी पंधरा सदस्यांची समन्वय समिती जाहीर केली. यामध्ये माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे, किरण बेदी, मेधा पाटकर, अखिल गोगोई, सनीता गोध्रा, अरविंद गौड, शिवेंद्रसिंह चौहान आणि राकेश रफीक यांचा समावेश आहे. या समितीमध्ये पंजाबचे माजी पोलीस महासंचालक शशिकांत, माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, ले. कर्नल ब्रिजेंद्र खोखर, रणसिंह आर्य, सामाजिक कार्यकर्ते अक्षय कुमार आणि विश्वंगभर चौधरी हे नवे चेहरे आहेत.

दरम्यान, न्यायमूर्ती संतोष हेगडे आणि अविनाश धर्माधिकारी वैयक्तिक कारणांमुळे शनिवारच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. भ्रष्टाचारविरोधी अराजकीय लढा पुढे नेण्यासाठी नवी ‘टीम` स्थापन करण्यात आल्याचे अण्णांनी म्हटले आहे.

First Published: Sunday, November 11, 2012, 09:43


comments powered by Disqus