Last Updated: Thursday, October 3, 2013, 23:14
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीकेंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं.
आंध्र प्रदेशचं विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण करण्याची मागणी खूप जुनी आहे. आंध्र प्रदेशमधील 10 जिल्हे तेलंगणाच्या वाट्याला येणार आहेत. यात हैदराबादसह अदिलाबाद, खम्मम, करीमनगर, मेहबूबनगर, मेडक, नालगोंडा, निझामाबाद, रंगारेड्डी आणि वारंगल जिल्ह्याचा समावेश आहे. तेलंगणाचे क्षेत्रफळ - 114,840 चौ. किमी असून लोकसंख्या - 3 कोटी 52 लाख 86 हजार 757 एवढी आहे. तेलंगणा राज्यात 17 लोकसभा मतदारसंघांचा तर 119 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. तेलंगणारहित आंध्र प्रदेशमध्ये 13 जिल्हे राहणार असून यात अनंतपूर, चित्तूर, कडप्पा, कर्नूल, श्रीकाकुलम, विझियानाग्राम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, गुंटूर, प्रकाशम, नेल्लोर यांचा समावेश आहे. नव्या आंध्र प्रदेशचे क्षेत्रफळ - 160,205 चौ. किमी असून लोकसंख्या - 4 कोटी 93 लाख 69 हजार 776 आहे. नव्या आंध्रमध्ये 25 लोकसभा मतदारसंघ राहणार असून 175 विधानसभा मतदारसंघ आहेत.
तेलंगणा राज्याच्या निर्मितीला कॅबिनेटने मंजुरी दिलीय. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीला तेलंगणाला मंजुरी देण्यात आली. आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन निर्माण झालेले तेलंगणा हे भारतामधले 29 वे राज्य असेल. आंध्रातले 23 पैकी 10 जिल्हे या नव्या राज्यात असतील. हैदराबाद हीच या दोन्ही राज्यांची आगामी 10 वर्षांसाठीच राजधानी असणार असल्याचं गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान तेलंगानाच्या निर्मितीचे जोरदार पडसाद उमटायला सुरुवात झाली असून रायलसीमा आणि सीमांध्र भागात उद्या बंदची हाक देण्यात आलीय. वायएसआर काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष हा संयुक्त आंध्र प्रदेशचा कट्टर समर्थक आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, October 3, 2013, 20:19