अरविंद केजरीवाल जनलोकपालसाठी होणार `शहीद` , Centre vs AAP: Confrontation continues over Kejriwal`s

अरविंद केजरीवाल जनलोकपालसाठी होणार `शहीद`

अरविंद केजरीवाल जनलोकपालसाठी होणार  `शहीद`
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता जनलोकपालच्या मुद्यावरून `शहीद` व्हायची तयारी सुरू केलीय. जनलोकपाल विधेयक संमत झाले नाही तर राजीनामा देऊ, अशी भाषा केजरीवाल करतायत. त्यामुळं अखेरीस राष्ट्रपतींनाच त्यांना कानपिचक्या द्याव्या लागल्यात.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता पुन्हा एकदा जनलोकपालच्या मुद्द्यावर आडून बसलेत. दिल्लीची पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. जनलोकपालचा मुद्दा परत गाजण्याची चिन्हे आहेत. अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याने पुन्हा राजकारण तापले आहे.

१३ फेब्रुवारीपासून दिल्ली विधानसभेचं अधिवेशन सुरू होतंय. या अधिवेशनात जनलोकपाल संमत झाला नाही तर राजीनामा देण्याची धमकी केजरीवाल यांनी दिलीय. जनलोकपालाच्या मुद्द्यावर भाजपने केजरीवालांना पाठिंबा दिलाय. मात्र केजरीवालांनी आपली नौटंकी बंद करून किमान आमदारांना विधेयकाची प्रत द्यावी, असा सल्ला केजरीवालांना पाठिंबा देणा-या भाजपनं दिलाय.

२००२च्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार कोणतंही विधेयक सादर होण्याआधी गृह मंत्रालयाकडून संमती मिळणं आवश्यक असतं. पण गृह मंत्रालयाचा आदेशच घटनाबाह्य असल्याचा आप सरकारचा दावा आहे.. केजरीवाल यांच्या या वक्त्यव्यांबाबत राजकीय वर्तुळात नाराजी आहे. शेवटी भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. चर्चेच्या माध्यमातूनच संसदेचं आणि विधिमंडळाचं कामकाज होतं. त्यामुळे प्रत्येक संबंधित घटकाने हे नियम पाळणं महत्त्वाचं आहे असं राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींनी केजरीवाल यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख कुणाकडं होता हे स्पष्ट झालं.

एकीकडे राष्ट्रपती खडे बोल सुनावत असताना सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडलीय. केजरीवाल यांनी जनलोकपालाच्या मुद्द्यावर राजीनामा दिला तरी ते परत बहुमताने निवडून येतील असा दावा अण्णांनी केलाय. थेट राष्ट्रपतींकडून कानपिचक्या मिळण्याची केजरीवाल यांची ही सलग दुसरी वेळ आहे. केजरीवाल आता राष्ट्रपतींनी दिलेला सबुरीचा सल्ला गांभीर्याने घेण्याचा समजूतदारपणा दाखवतात की पुन्हा एकदा दिल्लीला राजकीय अस्थिरतेत लोटतात याचं भाकीत या घडीला खुद्द केजरीवाल यांच्याशिवाय कुणीच करू शकत नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 09:32


comments powered by Disqus