Last Updated: Thursday, September 19, 2013, 11:41
www.24taas.com, झी मीडिया, जयपूर राजस्थान सरकारमधल्या आणखी एका मंत्र्यांवर बलात्काराचा आणि धमकीचा गुन्हा दाखल झालाय. बलात्कार केल्यानंतर ‘या प्रकरणाची वाच्यता केली तर तुझीही भंवरी देवी होईल’ अशी धमकीही या मंत्र्यानं पीडितेला दिली होती.
काँग्रसचे खादी ग्रामोद्योग मंत्री बाबूलाल नागर यांच्यावर एका विवाहीत महिलेनं बलात्काराचा आरोप केलाय. नोकरीचं आमीष दाखवून बाबूलालनं बलात्कार केल्याचं तिनं न्यायालयात सांगितलंय. बाबूलालनं फोन करून या महिलेला सिव्हिल लाईन्स भागातील स्वत:च्या बंगल्यावर बोलावून घेतलं होतं. महिला बंगल्यावर पोहचल्यानंतर गोड बोलून तो दुसऱ्या खोलीत गेला. तिथून फोन करून त्यानं तिला आतल्या रुममध्ये बोलावून घेतलं आणि दरवाजा बंद करून बलात्कार केला, असं या महिलेनं म्हटलंय. या महिलेच्या शरीरावर अनेक खुणाही आढळून आल्यात.
नागर यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी ती किंचाळली. याप्रकरणाबद्दल कुणाकडे तोंड उघडल्यास ज्याप्रमाणे भंवरी देवीचा अद्याप पत्ता लागलेला नाही त्याप्रमाणे तुझाही पत्ता कुणाला लागणार नाही, असं म्हणत बाबूलालनं तिला आणि तिच्या मुलालाही जिवे मारण्याचीही धमकी दिली. या महिलेने थेट न्यायालयात धाव घेऊन आपली फिर्याद दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार ११ सप्टेंबर रोजी नागर यांनी तिच्यावर बलात्कार केला. नागरनं मात्र आपल्यावरचे सगळे आरोप धादांत खोटं ठरवून आपल्याविरुद्ध कट-कारस्थान रचण्यात आल्याचं म्हटलंय.
माजी मंत्री महिपाल मदेरणा आणि नर्स भंवरी देवी कांड देशभरात गाजलं होतं. आता राजस्थानमधीलच आणखी एका मंत्र्यावर तसेच आरोप झाल्यानं पुन्हा एकदा राजकीय वातावरण गरम झालंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, September 19, 2013, 11:40