Last Updated: Monday, March 11, 2013, 08:55
www.24taas.com,नवी दिल्ली दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील प्रमुख आरोपी राम सिंह याने आज पहाटे पाच वाजता तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आज न्यायालापुढे हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने आपले जीवन संपविले.
राम सिंह याला तिहार कारागृहातील तीन नंबरच्या बराकीमध्ये ठेवण्यात आले होते. तेथेच त्याने पहाटे पाच वाजता शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतल्याचे समजताच त्याला दिन दयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
दिल्लीत १६ डिसेंबरला एका २३ वर्षीय तरुणीवर बसमध्ये सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी या बसचा चालक आणि प्रमुख आरोपी राम सिंह याला पोलिसांनी १७ डिसेंबरला अटक केली होती. या सहा आरोपींमध्ये एक अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे.
बलात्कार करून मारहाण केल्याने पिडीत तरूणीचा तेरा दिवसांनंतर २९ डिसेंबरला सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोपींना फाशी देण्याची मागणी देशभरातून करण्यात येत होती. आज या प्रकरणाची दिल्ली न्यायालयात सुनावणी होणार होती. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
First Published: Monday, March 11, 2013, 08:52