चिमुरडीवर पाशवी बलात्कार : आरोपीला बिहारमधून अटक, Delhi rape accused arrested from Bihar

चिमुरडीवर पाशवी बलात्कार : आरोपीला बिहारमधून अटक

चिमुरडीवर पाशवी बलात्कार : आरोपीला बिहारमधून अटक
www.24taas.com, नवी दिल्ली

एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी बलात्काराच्या घटनेनं राजधानी दिल्ली पुन्हा एकदा ढवळून निघालीय. या चिमुरडीची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मनोजकुमार या नराधमाला अटक करण्यात आलीय.

बिहारमधल्या मुझ्झपरनगर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आलीय. दिल्ली आणि बिहार पोलिसांच्या एका टीमनं शुक्रवारी रात्री उशीरा त्याला त्याच्या सासुरवाडीतून – चिकनौटा या गावातून अटक केली. त्यानंतर मुजफ्फरपूरच्या सीजेएम कोर्टामध्ये आरोपीला हजर करण्यात आलं. त्याला तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर धाडण्यात आलंय. त्याला आता पुढील चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात येणार आहे. मनोजनं आपला गुन्हा कबूल केलाय.

मनोजनं आपल्या शेजारीच राहणाऱ्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीला तब्बल दोन दिवस एका खोलीत कोंडून ठेवून तिच्यावर सतत दोन दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीची अवस्था अद्यापही चिंताजनक आहे. तिच्यावर नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडित चिमुरडीच्या पोटात काही मेणबत्ती आणि काचेचे तुकडेही सापडले होते. त्याचा संसर्ग तिच्या शरीरातही पसरलंय. या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या बातमीनं आपण आतून हेलावून गेल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलंय. या सर्व घटनेत पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचितन्ह निर्माण झालंय. पीडितेच्या कुटुंबानं हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी दोन हजारांची लाच दिल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, संबंधित पाच वर्षांची चिमुरडी कुपोषणाचा बळी होती तिचं वजन अवघं २० किलो आहे. तिला स्वामी दयानंद हॉस्पीटलमधून एम्समध्ये भरती करण्यात आलंय. तिच्या शरीरात घुसलेल्या वस्तू बाहेर काढण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय. डॉक्टरांनी आणखी २४ ते ४८ तास या मुलीसाठी धोकादायक ठरू शकल्याचा अंदाज व्यक्त केलाय. आरोपीनं तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय. मुलीच्या ओठांवर, छातीवर, गालांवर, गळ्यावर अनेक खुणा आहेत.

First Published: Saturday, April 20, 2013, 10:29


comments powered by Disqus