Last Updated: Thursday, December 19, 2013, 18:35
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत दिलेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुलीला न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. तर भारताने अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी माफी मागा, असे म्हटले आहे.
३० डिसेंबरला दिल्लीला जाऊन केंद्राशी चर्चा करणार असून ठोस आश्वासन मिळाले नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचं खोब्रागडेंनी सांगितलंय. देवयानी खोब्रागडेंना अमेरिकेत मिळालेल्या वागणुकीबाबत अमेरिकन प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केली असली तरी ती पुरेशी नसल्याची प्रतिक्रिया देशात उमटली आहे. केवळ दिलगिरी नको, तर अमेरिकेनं बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय वाणिज्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे. तर परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनीही अमेरिका हे प्रकरण संवेदनशीलतेनं हाताळेल असं म्हटलंय.
तसंच खोब्रागडेंवरचे सर्व आरोप मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही भारतानं केली आहे. दरम्यान, खोब्रागडेंना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करत हैदराबादमध्ये डावे पक्ष आणि सामाजिक संघटनांनी अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासासामोर निदर्शनं केली. अमेरिका वंशवादी असल्याचा आरोप करणारे बॅनर्स निदर्शकांनी झळकावले. अमेरिकेनं खोब्रागडेंची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात येत होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 19, 2013, 18:35