Last Updated: Wednesday, November 28, 2012, 12:44
www.24taas.com, नवी दिल्ली ‘झी न्यूज’नं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना केलेल्या अटकेचा जोरदार निषेध केलाय. कोळसा खाण घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या या प्रकरणात संपादकांना केलेली ही अटक बेकायदेशीर असून त्यांची तत्काळ सुटका व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.
गेल्या ६५ वर्षांत दुसऱ्यांदा मीडियावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न झालाय. माध्यमांचा आवाज दाबण्याचा केला गेलेला हा दिवस मीडियासाठी काळा दिवस ठरलाय. संपादकांना झालेल्या या बेकायदेशीर अटकेचा झी न्यूजनं जोरदार निषेध केलाय. या पत्रकार परिषदेत झी न्यूजचे सीईओ आलोक अग्रवाल आणि सुप्रीम कोर्टाचे वकील आर. के. हांडा यांनी झी न्यूजवतीनं अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
'दिग्विजय सिंह, अर्जुन मुंडा आणि रमन सिंह यांच्यावतीनं ‘झी’वर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी जिंदाल यांनी बातम्या थोपवण्यासाठी आणि नातेसंबंधांचाही वापर केला' अशी धक्कादायक माहितीही यावेळी उघड करण्यात आलीय. गेल्या दोन वर्षात यूपीए-२ नं अनेक चुका केल्या आहेत. त्यामुळेच जिंदाल यांना ४५ हजार कोटींचा फायदा पोहचू शकला हेही कॅग अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. या अहवालात जिंदाल यांच्या कंपनीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, अशी माहिती देत झी न्यूजनं जिंदाल ग्रुपची पोलखोल केलीय.
‘खुद्द नवीन जिंदाल यांनीच आधी संपादकांना लाच देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी ‘झी’लाही लाच देण्याचा प्रयत्न केला... जे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून सादर करण्यात आलं ते काटछाट करून सादर केलं गेलं. सहा तासांचं संभाषण आणि फक्त १४ मिनिटांचं रेकॉर्डिंग पुरावा कसा काय ठरू शकतो? कोणत्याही नवीन पुराव्याशिवाय ‘झी’च्या संपादकांना अटक कशी काय करण्यात आली? ‘झी’नं तपासात संपूर्ण सहकार्य देऊनही ही अटक कशासाठी?२ ऑक्टोबर रोजी केस दाखल झाली होती मग २७ नोव्हेंबरला अटक का करण्यात आली? असं अनेक सवाल ‘झी न्यूज’नं उपस्थित केले आहेत.
फक्त १४ मिनिटांचं रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरून अटक कशी काय करण्यात आली... यामध्ये तपास आणि कारवाईचा काही एक संबंध नाही, असं सांगत दोन्ही संपादकांची त्वरीत सुटका व्हायला हवी, अशी मागणी झी न्यूजनं केलीय.
First Published: Wednesday, November 28, 2012, 12:27