केदारनाथ: मदतीचा हात की ऑनलाईन घात! Fake websites for helping Kedarnath flood victims

केदारनाथ: मदतीचा हात की ऑनलाईन घात!

केदारनाथ: मदतीचा हात की ऑनलाईन घात!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

उत्तराखंडात केदारनाथ आणि परिसरात घडलेल्या महाप्रलयानंतर तेथील लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. त्यानिमित्ताने अनेक वेबसाइट्स बनवण्यात आल्या असून त्यावर लोकांना मदतीचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र, या वेबसाईट्सद्वारे मदत करू इच्छिणाऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार खुद्द भारतीय हवाई दलाने दिल्ली पोलिसांकडे केली आहे. कारण, उत्तराखंडाला मदत करण्याच्या नावाखाली अनेक खोट्या वेबसाईट आणि फेसबुक पेजेस तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी भारतीय हवाई दलाचंच नाव वापरलं जात आहे.

उत्तराखंडात महाप्रलयानंतर भाविकांचे दागिने लुटण्याचे प्रकार घडल्यानंतर अशा प्रकारे ऑनलाईन लुटारूंचा सुळसुळाट झाला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली अनेक खोट्या वेबसाईट्स आणि फेसबुक पेजोस तयार करण्यात आली आहेत. या वेबसाईट्स लोकांना बँक अकाऊंट नंबर तसंच इतर माहिती शेयर करायला लावतात. आणि लोकांना लुटतात. मुख्य म्हणजे या वेबसाईट्स आणि फेसबुक पेजेसवर भारतीय हवाई दलाचा लोगो वापरण्यात येत आहे. यासंदर्भात भारतीय हवाई दलाने तक्रार केली आहे. ‘फेसबुकची आयएएफ (भारतीय हवाई दल) टीम उत्तराकंडातील पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचं आवाहन करत आहे. तुम्हालाही या कार्यास हातभार लावायचा असल्यास मदतीची रक्कम पुढील अकाऊंट नंबरवर जमा करा’ अशा अर्थाच्या पोस्ट्स फेसबुकवर पाहायला मिळत आहेत. प्रत्यक्षात या पेजेसचा उत्तराखंडातील मदताकार्याशी वा भारतीय हवाई दलाशी कुठलाच संबंध नसल्याचं सांगण्यात येत आहे.

अशा प्रकारच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजेसमुळे हवाई दलाची बदनामी होत असल्याचा आरोप करत भारतीय हवाई दलाने दिल्ली पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. प्रथम अशा वेबसाईट्स आणि पेजेसवर बंदी घालण्यात यावी, असं हवाई दलाचं म्हणणं आहे. यासंदर्भात कलम ४३० आणि सायबर क्राईम या दोन्ही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मागे कुठलं रॅकेट कार्यरत आहे, याचा शोध दिल्ली पोलीस लावत आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 4, 2013, 16:32


comments powered by Disqus