Last Updated: Friday, February 1, 2013, 16:30
www.24taas.com, नवी दिल्ली सुधारित लोकपाल बिलाला कॅबिनेटनं मंजुरी दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी या लोकपाल बिलावर चांगलेच ताशेरे ओढलेत. या सुधारित बिलात सरकारनं स्वत:चा ड्राफ्ट बनवलाय... आणि आमच्या मागण्यांकडे केवळ दुर्लक्ष केलंय, असं अण्णांनी म्हटलंय. सरकारनं केवळ चर्चाच केली, सुधारणा मात्र नाही, असं म्हणत अण्णांना आता जनआंदोलन हाच एकमेव पर्याय असल्याचं स्पष्ट केलंय.
‘सरकारनं लोकपाल बिलाच्या बाबतीत देशवासियांची फसवणूक केली, पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला नाही, यामुळेच आम्ही पुन्हा एकदा जनतेच्या समोर ही गोष्ट लक्षात आणून देणार आहोत. यूपीएनं लोकपाल बिलाचा स्वत:चा वेगळाच ड्राफ्ट बनवलाय. आम्ही दिलेला ड्राफ्ट संसदेपर्यंत पोहचलेलाच नाही. लोकपाल बिलाच्या बाबतीत सरकार प्रत्येक वेळेस नागरिकांची दिशाभूल केलीय. विधेयकाच्या बाबतीत सरकार अगोदरही खोटं बोलत होतं आणि आत्ताही…’ असं अण्णांनी म्हटलंय.
‘सीबीआयवर सरकारचं नियंत्रण अयोग्य आहे, ते लोकपालच्या कक्षेत यायला हवं’ अशी आपली मागणी अण्णांनी पुन्हा एकदा मांडलीय. तसंच सरकारनं चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनाही लोकपालच्या कक्षेत आणावं, त्याशिवाय लोकपाल बिलाला काहीही महत्त्व असं त्यांनी सांगितलंय.
याचवेळी, सत्ता ही नशेप्रमाणे आहे विषाप्रमाणे नाही, असं म्हणत अण्णांनी राहुल गांधींनाही चांगलाच टोला हाणलाय. गरज पडली तर मी पुन्हा एकदा रामलीला मैदानावर ठाण मांडून बसेन, असा इशाराही अण्णांनी दिलाय.
First Published: Friday, February 1, 2013, 16:30