Last Updated: Tuesday, September 24, 2013, 19:56
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीजम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय... सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी हा आरोप फेटाळलाय. तर व्ही. के. सिंह यांनी त्या मंत्र्यांची नावे सांगितल्यास चौकशी करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलंय.
`जम्मू-काश्मीरमधील शांतता अबाधित ठेवण्यासाठी लष्कराला तेथील काही मंत्र्यांना निश्चित अशी रक्कम द्यावी लागते. हा प्रकार अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहे`, असा सनसनाटी आरोप माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय... जम्मू-काश्मीरमध्ये सत्तापालटाचे कारस्थान रचल्याचा आरोप झाल्यानं भडकलेल्या सिंह यांनी राज्यातील राजकारण्यांनाच आरोपीच्या पिंज-यात उभं केलं. `राज्यातील सगळेच नाहीत पण, काही मंत्री व राजकारणी असे आहेत, ज्यांना ठराविक रक्कम दिली जाते`, असं सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
त्यावरून मोठा गहजब उडालाय. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगून चौकशीची मागणी केली.
व्ही. के. सिंह यांच्या खळबळजनक आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जातेय... तर सिंह यांनी संबंधित मंत्र्यांची नावे जाहीर केल्यास केंद्र सरकार त्यांची चौकशी करेल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, आपल्या वक्तव्यावरून गहजब उडाल्यानंतर व्ही. के. सिंह यांनी सारवासारव सुरू केलीय. संबंधितांना लाच म्हणून पैसे देण्यात आलेले नाहीत, असा खुलासा आता माजी लष्कप्रमुखांनी केलाय.
माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्यावर दररोज नवनवे आरोप होत असून, ते देखील खळबळजनक वक्तव्ये करून वाद ओढवून घेत आहेत. लष्करप्रमुखपदासारखे सर्वोच्च पद भूषवणारी व्यक्ती अशाप्रकारे वादात अडकल्याने या पदाची गरीमाच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
(Zee Media)
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 24, 2013, 19:56