Last Updated: Wednesday, December 11, 2013, 15:25
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदेशभर आधारकार्ड योजना राबवणारे इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलकेणी यांना काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरविणार असल्याचे वृत्त सध्या दिल्लीच्या राजकारणात येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी निलकेणी यांना उतरविणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
दिल्ली, छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पराभवाची कारणे शोधण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. तसेच त्यांनी निकालानंतर योग्यवेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल, असेही म्हटले होते. तेव्हापासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात काँग्रेसच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची घाई या निकालावरून काँग्रेस करणार नसल्याचे या निकालावरून सांगण्यात येत आहे. या पदासाठी अर्थमंत्री पी. चिदंबरम, संरक्षणमंत्री ए. के. अँटनी किंवा गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण, काँग्रेसने टेक्नोसॅव्ही म्हणून ओळखले जाणारे आणि स्वच्छ प्रतिमा असणारे नंदन निलकेणी यांना मोदींच्या समोर उभे करण्याचे योजल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
आधारकार्ड योजना राबवून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले नंदन निलेकणी हे येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण बंगळूर मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट आहे. तसेच ते तरुणांमध्येही लोकप्रिय आहेत. मात्र, निलकेणी यांनी आपण या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 11, 2013, 15:25