फोनवर चॅटींग, २३ वर्षाच्या युवतीचा `तो` निघाला म्हातारा..., phone chatting Story

फोनवर चॅटींग, २३ वर्षाच्या युवतीचा `तो` निघाला म्हातारा...

फोनवर चॅटींग, २३ वर्षाच्या युवतीचा `तो` निघाला म्हातारा...
www.24taas.com, कन्नूर

आजकाल लग्न जमायच्या वेगवेगळ्या तऱ्हा समोर येऊ लागल्या आहेत. म्हणजे फेसबुक वर किंवा सोशल नेटवर्क साईटवर एखाद्या व्यक्तीची ओळख होणं आणि त्याचं रूपांतर प्रेमात होणं ही नवीच पद्धत रूढ होत आहे. असाच काहीसा एका तरूणीला अनुभव आला आहे. गेले वर्षभर ‘त्या’ २३ वर्षीय युवतीच्या फोनवरून आपल्या भावी जोडीदाराशी तासन्तास प्रेमाच्या ‘गुजगोष्टी’ होत होत्या. कधी एकदा आपल्या प्रियकराला भेटतेय असे या युवतीला झाले होते. अखेर कन्नूरहून थिरुअनंतपूर येथे आलेल्या या तरुणीने आपल्या ‘फोन दोस्त’ला प्रत्यक्ष पाहिले आणि तिच्या एक वर्षाच्या ‘लव्ह स्टोरी’च्या पार ठिकर्‍या उडाल्या. तिचा ‘स्वीट हार्ट’ चक्क ६७ वर्षांचा ‘बुढ़ा’ निघाला.

अभियांत्रिकीत पोस्ट ग्रॅज्युएट असलेली कन्नूरची २३ वर्षीय युवती आपल्या भावी जीवनसाथी निवडण्याचे स्वप्ने पाहत होती. गेल्या वर्षी चुकून एका मोबाईलवरील भारदस्त आवाजाने तिच्या मनाला भुरळ घातली. सुमारे वर्षभर तिच्या फोनवरील ‘स्वीट हार्ट’शी तासन्तास प्रेमाच्या गुजगोष्टी व्हायच्या. अखेर एक दिवस ती आपल्या या ‘स्वीट हार्ट’च्या शोधासाठी थिरुअनंतपूर येथे आली.

अनेक तास बस स्टॉपवर आपल्या ‘स्वीट हार्ट’ची प्रतिक्षा करणार्‍या त्या युवतीची अवस्था पाहून अखेर पोलीस तिच्या मदतीला धावले. त्यांनी मोबाईलधारकाचा शोध घेत त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. इतके दिवस आपण ज्याच्याशी फोनवरून प्रेमाच्या गुजगोष्टी करीत होतो तो गृहस्थ चक्क पांढर्‍या केसांचा ६७ वर्षीय वृद्ध असल्याचे पाहताच ती तरुणी भोवळ येऊन पडली. आपण केवळ गंमत म्हणून ‘या’ युवतीशी मोबाईलवर बोलत होतो. त्यात आपला कोणताही दुष्ट हेतू नव्हता असे त्या वृद्धाने स्पष्ट केले. पोलिसांनी अखेर ‘प्रेमभंग’ झालेल्या ‘त्या’ युवतीची रवानगी तिच्या पालकांकडे केली.

First Published: Wednesday, November 14, 2012, 10:48


comments powered by Disqus