राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराज, Rahul Gandhi angry with the Supreme Court`s decision

राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराज

राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराज
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांची फाशी रद्द केल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केलीय. ज्या देशात पंतप्रधानांना न्याय मिळत नाही त्या देशात गरिबांना कुठून न्याय मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, जयललितांनी राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटू लागलेत. आज बंगळुरूमध्ये काँग्रेसनं जयललितांविरोधात आक्रमक होत आंदोलन केलं.

सुप्रीम कोर्टानं राजीव गांधींच्या मारेक-यांची फाशी रद्द केल्याचा निर्णय दिलाय. त्यानंतर लगेचच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दोषींच्या सुटकेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून तीन दिवसांत सर्वांची सुटका करण्याच निर्णय घेतलाय. त्यावरून आता केंद्र आणि तामिळनाडू सरकारमध्ये जुंपलीय.

डॉ. मनमोहन सिंग
तामिळनाडू सरकारच्या राजीव गांधी मारेक-यांच्या सुटकेच्या निर्णय़ावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आगपाखड केलीय. मुख्यमंत्री जयललिता यांचा निर्णय चुकीचा असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय. तर हा निर्णय न्यायसंगत नसल्याचीही टीका केलीय. तसंच एकादं सरकार दहशतवाद्यांना कसं पाठिशी घालू शकतं असा सवालही पंतप्रधानांनी केलाय. माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या म्हणजे देशाच्य़ा आत्म्यावर घाला असल्याचं मनंमोहन सिंग यांनी नमूद केलंय.

आरपीएन सिंग
राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याच्या जयललिता सरकारच्या निर्णयाला काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याचं गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी सांगितलंय...जयललिता सरकारचा हा निर्णय अतिशय दुर्भाग्यपूर्ण असल्याची टीकाही त्यांनी केलीय... तर आता पुनर्विचार याचिका टाकणा-या काँग्रेसनं दया याचिकेवर गेल्या दहा वर्षांत का निर्णय घेतला नाही... असा सवाल भाजपनं केलाय...

पी. चिदंबरम
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोर्टाच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया दिलीये. या निर्णयामुळे आपण दुःखी आहोत, असं म्हणता येणार नाही... मात्र राजीव गांधींच्या हत्येमुळे झालेली जखम कायम राहील, असं त्यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं मारेक-यांना निर्दोष म्हणून सोडलेलं नाही. त्यांच्या दया याचिकेवर निर्णयास झालेला विलंब हे कारण पुरेसं वाटल्यानं कोर्टानं फाशी रद्द केली असेल, असं ते म्हणाले.

शिवसेना
राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेला तामिळनाडू नव्हे तर काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. गेल्या दहा वर्षात दयायाचिकेवर सत्ताधारी काँग्रेसनं का निर्णय घेतला नाही असा सवालही शिवसेनेनं केलाय.

भाजप
राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याचा जयललिता यांनी घेतला असला तरी मारेक-यांना सोडू नये अशी भूमिका भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी मांडलीय. तर जेडीयूचे अली अनवर यांनी मतांसाठी सारंकाही हा प्रकार होत असल्याची प्रतिक्रिया दिलीय. तर जम्मू काश्मीरमध्ये या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटतायत. संसदेवरील हल्ला प्रकरणात दोषी ठरलेल्या अफजल गुरुला दुसरा न्याय का ? असा सवाल पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी विचारलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014, 17:17


comments powered by Disqus