`भगव्या` दहशतवादाचा `ड्रामा`, केंद्रीय गृहमंत्र्यांनी मागितली क्षमा! Sushilkumar Shinde regrets ‘saffron terror’ remark

भगव्या दहशतवादाचा ड्रामा, केंद्रीय गृहमंत्र्यांनी मागितली क्षमा!

भगव्या दहशतवादाचा ड्रामा, केंद्रीय गृहमंत्र्यांनी मागितली क्षमा!
www.24taas.com, नवी दिल्ली

जयपूरमधील काँग्रेस अधिवेशनात भगव्या दहशतवादाबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अखेर माफी मागीतली आहे. माझ्या वक्त्यव्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो असे शिंदेंनी बुधवारी संध्याकाळी जाहीर केलं.

दहशतवादाला धर्माशी जोडण्याचा आपला हेतू नव्हता, आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला अशी सारवासारवही शिंदेंनी केलीय. जयपूरमध्ये भगव्या दहशतवादाबाबत शिंदेंनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपने आक्रमक धोरण स्वीकारले होते. त्यांनी माफी मागेपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता.

या मुद्यावर भाजपने बुधवारी राजधानीत आंदोलन केलं. बजेट अधिवेशनापूर्वी तडजोडीचे सर्व दोर कापले गेल्यानंतर अखेर गृहमंत्र्यांना माफी मागण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे.


सुशीलकुमार शिंदेंनी भगव्या दहशतवादासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन भाजप चांगलंच आक्रमक झालं होतं. शिंदेंनी माफी मागावी, अशी भाजपची मागणी होती. त्याचसाठी भाजपनं आज दिल्लीत सुशीलकुमार शिंदेंविरोधात आक्रमक आंदोलन केलं. या आंदोलनानंतर भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जंतर मंतर इथं काढलेल्या मोर्चात भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. “आम्ही अतिरेकी असलो, तर संसदेत बसण्याचा आम्हाला अधिकार नाही. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे आणि सरकारनं याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी”, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली आहे.

First Published: Wednesday, February 20, 2013, 21:37


comments powered by Disqus