तरूण तेजपालचा " लैंगिक तेहलका", Tarun Tejpal : journalistic sexual exploitation of women

दुसऱ्यांचे भांडे फोडणाऱ्या तरूण तेजपालचा "लैंगिक तेहलका"

दुसऱ्यांचे भांडे फोडणाऱ्या तरूण तेजपालचा
www.24taas.com, झी मीडिया, पणजी

स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून करोडो रूपयांचे घोटाळे उघडकीस आणणा-या तेहलका मॅगझिनचे एडिटर इन चीफ तरूण तेजपाल यांच्यावर एका महिला पत्रकाराने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केलाय. या आरोपानंतर तरूण तेजपाल यांनी तूर्तास सहा महिन्यांसाठी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतलाय.

तेहलकामध्येच काम करणा-या या तरूण महिला पत्रकाराने मॅगझीनच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांना इमेलद्वारे आपले लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केली होती. मात्र तेहलकाने यासंदर्भात केलेल्या कारवाईने महिला पत्रकाराचे समाधान झालेले नाही. या प्रकारावर तिने तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

तेजपाल यांनी सहा महिन्यांसाठी पद सोडल्यानं कर्मचारी आता समाधानी असल्याचा दावा तेहलकाने केलाय. मात्र हे असत्य असल्याचे खुद्द महिला पत्रकारानेच स्पष्ट केलंय. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकारावर जोरदार टीका केलीय. स्वतःलाच सहा महिन्यांची शिक्षा करून घेऊन तेजपाल यांनी पळवाट शोधलीय अशी टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत प्रभावळकर यांनी केलीय. मॅगझीनने गोव्यात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी तेजपाल यांनी या महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलेनं केलाय.

लैंगिक शोषणाच्या आरोपावरून तरूण तेजपाल पूर्णपणे अडचणीत आलेत. तेजपाल स्वतःच कशी काय शिक्षा ठरवू शकतात, असा सवाल महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी, भाजपच्या मिनाषी लेखी यांनीही तेजपाल यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसनंही मार्मिक शब्दात या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 21, 2013, 19:02


comments powered by Disqus