धूर सोडणाऱ्या शाहरुखला नोटीस - Marathi News 24taas.com

धूर सोडणाऱ्या शाहरुखला नोटीस

www.24taas.com, राजस्थान 
 
वानखेडेवर धिंगाणा घातल्यानं वादात अडकलेल्या शाहरुखच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. बॉलिवूड स्टार शाहरुख खानला राजस्थान पोलिसांनी नोटीस बजावलीय. एप्रिल महिन्यात आयपीएल खेळांच्या दरम्यान जयपूरच्या सवाई माधोसिंग मैदानात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना तो कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. याच संबंधात जयपूर कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश शाहरुख खानला देण्यात आलेत.
 
मागच्याच आठवड्यात, धिंगाणा घातल्याप्रकरणी शाहरुखवर ५ वर्षांसाठी वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्याची बंदी घालण्यात आलीय. हे वादळ अजून पुरतं क्षमलं नसतानाच शाहरुखच्या हातात ही नवी नोटीस पडलीय. ८ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या आयपीएल मॅचमध्ये शाहरुख खानला सिगारेट पिताना टीव्हीवर अनेकांनी पाहिलं होतं. या विरोधात जयपूरचे रहिवासी असलेले आनंद सिंग राठोड यांनी ९ एप्रिल रोजी एक तक्रारही दाखल केली होती. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी असतानाही बॉलिवूड अभिनेता आपल्या सगळ्या फॅन्ससमोर धूर सोडताना दिसल्याचं, राठोड यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.
 
शाहरुख हा अनेकांसाठी आयडॉल आहे, कित्येकजण त्याची नक्कलही करतात, पण तो जेव्हा सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतो तेव्हा तो नकळत एक चुकीचा संदेश तरुण चाहत्यांपर्यंत पोहचवतो, असंही तक्रारकर्त्यानं आपल्या तक्रारीत नोंदवलंय. कोर्टानं या तक्रारीची गंभीर दखल घेत २६ मे रोजी होणाऱ्या पुढच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात उपस्थित राहण्याची नोटीस शाहरुखला धाडलीय.

First Published: Tuesday, May 22, 2012, 12:09


comments powered by Disqus