एमसीए घटनेसाठीही किंग खाननं मागितली माफी - Marathi News 24taas.com

एमसीए घटनेसाठीही किंग खाननं मागितली माफी

www.24taas.com, चेन्नई
 
काल चेन्नईत आयपीएल सीझन ५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नईवर मात करत आपल्याला ‘आयपीएल किंग टीम’ म्हणून सिद्ध केलं. या विजयामुळे कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक आणि फिल्म स्टार शाहरुख खान इतका खुश झाला की वानखेडे स्टेडीयम केलेल्या गैरवर्तवणुकीबद्दल त्यानं तिथंच माफी मागितली.
 
१७ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान झालेल्या मॅचनंतर शाहरुखनं धिंगाणा घातल्याचा आरोप एमसीएनं केला होता. शाहरुखनं मद्यधुंद अवस्थेत एमसीए स्टेडियमच्या एका सुरक्षाकर्मीला शिवीगाळ केली शिवाय मारहाणही केली. तसंच यावेळी त्यानं एमसीए आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनाही धमक्या दिल्या, अर्वाच्य भाषेत त्यांनाही शिवीगाळ केली, अशी तक्रार एमसीएनं मरिन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. या घटनेबद्दल एमसीएनं शाहरुखवर ५ वर्षांसाठी वानखेडेवर प्रवेशबंदीही घातली आहे.
 
याबद्दल शाहरुखनं आपण शिवी दिली, मात्र आपण माफी मागणार नसल्याचंही म्हटलं होतं. त्यांनीच माझी माफी मागावी असंही त्यानं म्हटलं होतं. पण, कोलकाता नाइट रायडर्सनं आयपीएल सीझन ५ ची फायनल मॅच घशात घातली. आणि शाहरुखचा सगळा राग निवळला. आणि त्यानं ताबडतोब एमए चिदंबरम स्टेडियमवरच एमसीए घटनेबाबत माफी मागून टाकली.
 

First Published: Monday, May 28, 2012, 18:36


comments powered by Disqus