मोदींविरोधात मोर्चेबांधणीला जोर... - Marathi News 24taas.com

मोदींविरोधात मोर्चेबांधणीला जोर...

 www.24taas.com  
 
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्यासह दहा वरिष्ठ नेत्यांनी मोदींच्या विरोधात रणनिती आखण्यासाठी बैठक बोलावली आहे.
 
मुंबई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेल्या नरेंद्र मोदींचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं होतं. इतकंच नव्हे तर मोदींमुळे संजय जोशींना राजीनामाही द्यावा लागला होता. भाजप त्यांच्यासमोर झुकल्याचंच यातून दिसून आलं. मात्र, आता त्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी सुरू झालीय. माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली काशीराम राणा, सुरेश मेहता यांच्यासह दहा वरिष्ठ नेते नरेंद्र मोदींच्या विरोधात एकत्र आलेत. निवडणुका जवळ आल्यानं केशुभाई पटेल यांनी चार सभा घेतल्या. या सभांमध्येही त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
 
गुजरातमध्ये केशुभाईंचं नेतृत्व माननारा मोठा वर्ग आहे. तसंच पटेल समुदायावरही त्यांची घट्ट पकड आहे. परिणामी, मोदींच्या विरोधातल्या मोर्चेबांधणीचा भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
 

First Published: Wednesday, May 30, 2012, 16:20


comments powered by Disqus