कोंकण रेल्वेची 'हिमालय' झेप - Marathi News 24taas.com

कोंकण रेल्वेची 'हिमालय' झेप

www.24taas.com, जम्मू 
 
सह्याद्रीत यशस्विरीत्या रेल्वेमार्ग उभारण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या कोंकण रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. कोंकण रेल्वेनं थेट हिमालयाएवढी झेप घेत जम्मू-काश्मीरला जोडणारा रेल्वेमार्ग उभारण्याची जबाबदारी स्विकारलीय.
 
सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून धावत जाणारी कोंकण रेल्वे... नऊ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ही अदभूत कल्पना सत्यात उतरली आणि तंत्रज्ञानाचा एक नवा मापदंड कोंकण रेल्वेनं जन्माला घातला. सह्याद्रीत धावणाऱ्या याच कोंकण रेल्वेनं आता हिमालयाएवढं आव्हान स्विकारलंय. जम्मू आणि काश्मिरला जोडणारा देशातला सर्वात महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प उभारण्याची जबाबदारी कोंकण रेल्वेवर सोपवण्यात आलीय. ३२८ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गातले तब्बल १८ बोगदे आणि छोटे-मोठे २६ पूल उभारण्याचं काम कोंकण रेल्वे करत आहे. गेल्या चार वर्षांपासून पाच हजारांपेक्षा जास्त अधिकारी आणि कामगार या प्रकल्पावर अहोरात्र मेहनत घेत आहेत. यात कोंकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
 
या प्रकल्पातली सर्वात कठिण आणि जगासमोर अभियांत्रिकीचा  अविष्कार ठरलाय तो, चेनाब नदीवरील ३५९ मीटर उंचीचा रेल्वे पूल.... कुतूब मिनारसह फ्रान्सच्या आयफेल टॉवरलाही लाजवेल असा हा जगातला सर्वात उंच रेल्वेपूल उभारण्याचं काम कोंकण रेल्वे मोठ्या कौशल्यानं  करतंय. विशेष म्हणजे वारंवार खोळंबणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या रस्ते वाहतुकीला या रेल्वेपुलामुळं सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.
 
.
 

First Published: Saturday, June 16, 2012, 16:14


comments powered by Disqus