केंद्र सरकारवर अण्णांची लोकपाल तोफ - Marathi News 24taas.com

केंद्र सरकारवर अण्णांची लोकपाल तोफ

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
केंद्र सरकारचा ड्राफ्ट आम्हांला मंजूर नाही. सक्षम लोकपाल बिल येत नाही तोपर्यंत यांच्याविरोधी आवाज उठवणारच आहे. सरकार म्हणतं करा उपोषण, आमचं काही बिघडत नाही, पण एक दिवस या देशातील जनताच धडा  शिकवणार आहे, असा ईशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.
 
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल कायदा करावा, अशी मागणी करणा-या अण्णा हजारे यांनी संसदेच्या स्थायी समितीवर
फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. जंतर मंतर येथे उपोषण करण्यासाठी आलेल्या अण्णांनी दिल्लीत दाखल होताच स्थायी समितीवर तोफ डागली.
 
मी हिंम्मत कधी हरणार नाही, गेली ३० वर्ष यासाठी झगडतो आहे. शेवटचा श्वास घेईपर्यंत सतत लढत राहणार आहे. जोपर्यंत  जनलोकपाल येणार नाही तोपर्यंत ह्या देशातील भ्रष्टाचार संपणार नाही. जर का २२ तारखेपर्यंत जनलोकपाल पास नाही झालं तर २७ डिसेंबरपासून रामलीलावर बेमुदत उपोषण करणार. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच याचं काम आहे. हे सरकार आहे की, किराणा मालाचं दुकान, असा सवालही अण्णांनी यावेळी उपस्थित केला.
 
संपूर्ण देशासोबत या सरकारने धोका केला आहे.  पुढची लढाई ही रस्त्यावर उतरून करावी लागणार, पण तीसुद्धा अंहिसेच्या मार्गानेच. मात्र, उद्या सर्वपक्षीय लोकांना चर्चेला बोलावलं आहे, जर का  काँग्रेस नाही आलं तर त्यांची काय निती आहे, ते कळूनच येईल आपल्याला, असे अण्णांनी यावेळी स्पष्ट केलं. राहुल गांधी यांना आपण का टार्गेट करता, सोनियांना का नाही? या प्रश्नावर अण्णानी उत्तर दिलं, 'वो बिमार है.. बिमार लोगो के बारे मे नही बोला जाता..'
 
दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी लोकपाल विधेयकावर चर्चा करण्यासाठी बुधवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

First Published: Saturday, December 10, 2011, 14:35


comments powered by Disqus