Last Updated: Thursday, July 5, 2012, 16:03
www.24taas.com, मुंबई फेब्रुवारी २०११ पासून आपल्या कुटुंबासकट बेपत्ता झालेली बॉलिवूड स्टार लैला खान हिची जम्मू-काश्मिरमध्ये हत्या करण्यात आली असावी असं सांगण्यात येत आहे.
एटीएसने असा संशय व्यक्त केला, की लैला खानचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था (आयएसआय) तसेच लष्कर-ए-तोएबाशी संबंध होते. लैलाचं खरं नाव रेश्मा पटेल असून ती काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये काम करत होती. तिचा राजेश खन्नासोबत वफा हा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. लैला गेल्या वर्षी मुंबईमधून आपली आई सलीना पटेल, बहिण अजमिना पटेल आणि सावत्र वडील आसिफ शेख आणि एक भाऊ यांच्यासह बेपत्ता झाली. लैला जम्मू-काश्मिर येथील किश्तवाडला एका लग्नानिमित्त मुंबईहून रवाना झाली होती. लैलासोबत काहीतरी बरं-वाईट झालं असावं, असा लैलाचे वडिल नादिर पटेल यांना संशय आहे.
लैला लष्कर-ए-तोएबाचा आतंकवादी परवेझ इकबाल टाक याच्या संपर्कात होती. दिल्ली हायकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये लैलाचंही नाव संशयितांमध्ये आहे. मुंबईतल्या काही जागांची माहिती काढून ती लष्कर-ए-तोएबाला देण्यासाठीच लैला आपल्या कुटुंबासहित मुंबईला आली होती, असं भारतीय गुप्तचर संस्थांचं म्हणणं आहे.
दिल्ली हायकोर्टबाहेरील बाँबस्फोटातील आतंकवादी जुनेद आक्रम याची आतंकवाद्यांनी जेव्हा किश्तवाडमध्ये हत्या केली, तेव्हाच लैलाचीही केली असावी, असा गुप्तचर संस्थांचा अंदाज आहे.
First Published: Thursday, July 5, 2012, 16:03