बेस्ट बेकरी प्रकरणात चौघांना जन्मठेप - Marathi News 24taas.com

बेस्ट बेकरी प्रकरणात चौघांना जन्मठेप

www.24taas.com, मुंबई 
 
गुजरातमध्ये २००२मध्ये झालेल्या नृशंस दंगलीदरम्यानच्या बेस्ट बेकरी हत्याकांडाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच जणांची सोमवारी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. मात्र या प्रकरणातील चार जणांना दोषी ठरवत त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.
 
बडोद्यातील बेस्ट बेकरी प्रकरणातील पाच आरोपींना ठोस पुरावा नसल्यामुळे मुंबई हायकोर्टाने निर्दोष घोषित केले आहे. न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी. डी. कोदे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला एका आरोपीने आव्हान दिले होते.त्याच्या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने ३ जुलै रोजी राखून ठेवली होती. तर चार जणांच्या जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.
 
कनिष्ठ न्यायालयाने सहा वर्षांपूर्वी या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गोध्रा दंगलींनंतर उसळलेल्या हिंसाचारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी १४  जणांनी गुजरातमधील बडोदा शहरातील हनुमान टेकडी येथील बेस्ट बेकरीत आश्रय घेतला होता. सुमारे २० जणांच्या जमावाने त्यांना जिवंत जाळले. या प्रकरणातील १७ आरोपींपैकी नऊ जणांविरोधातील गुन्हा सिद्ध झाल्याने विशेष न्यायालयाने२००६ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला या आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

First Published: Monday, July 9, 2012, 23:53


comments powered by Disqus