Last Updated: Friday, July 13, 2012, 13:09
www.24taas.com, बागपत, उत्तरप्रदेश पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका खाप पंचायतीनं एक तुघलकी फर्मानच काढलंय. वयोवर्षं ४० पर्यंतच्या कोणत्याही महिलांनी आणि तरुणींनी बाजारात जायचं नाही तसंच त्यांनी मोबाईलवरही बोलू नये, असा आदेश या खाप पंचायतीनं दिलाय.
महिलांच्या आणि मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी या खाप पंचायतीना असा निर्णय दिला होता. बागपतजवळच्या आसरा गावातील या पंचायतीत अनेक मुस्लिम लोक सहभागी झाले होते. या पंचायतीत निर्णय देण्यात आला की, ४० वर्षांखालील कोणतीही महिला किंवा मुलगी गावाबाहेर लागणाऱ्या बाजारात जाणार नाही तसंच त्यांना मोबाईलवर बोलण्यासही बंदी घालण्यात आली. या नियमांचं उल्लंघन कुणी केलं तर पुन्हा एकदा पंचायतीची बैठक बोलावण्यात येईल आणि त्यामध्ये संबंधित व्यक्तीला शिक्षा सुनावण्यात येईल.
अर्थातच, या तुघलकी फतव्यांमुळे महिलांच्या अधिकारावर गदा आली. काही तक्रार पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या खाप पंचायतीच्या दोन पंचांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं.
First Published: Friday, July 13, 2012, 13:09