बेळगाव महानगरपालिका बरखास्त - Marathi News 24taas.com

बेळगाव महानगरपालिका बरखास्त

झी २४ तास वेब टीम, बेळगाव
 
कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.
 
१ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्य स्थापनेच्या दिवशी मराठी भाषिकांनी काळा दिवस पाळल्यानं राज्य सरकारनं बेळगाव महापालिकेला बरखास्तीची कारणे दाखवा नोटीस दिली होती. महापालिकेनं अनुदान वापरलं नाही आणि काळा दिवस पाळला असा ठपका ठेवून अखेर कर्नाटक सरकारनं बेळगाव महापालिका बरखास्तीचा आदेश दिला. अलिकडेच मराठी भाषिक नगरसेवकांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा मराठी भाषिकांचा झेंडा फडकावला होता. पण कर्नाटक सरकारनं बरखास्तीचा वरवंटा फिरवून पुन्हा एकदा दडपशाही केलीय. मराठीद्वेष्ट्या निर्णयाविरोधात सीमावासीय मराठी भाषकांमध्ये संतापाची लाट उसळलीय.
 
५६ वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारनं सातत्यानं अन्याय आणि दडपशाही केलीय. मराठी भाषकांची सत्ता असताना यापूर्वीही बेळगाव महापालिका बरखास्त करून कर्नाटक सरकारनं लोकशाही पायदळी तुडवली होती. २००४ मध्ये तर तेव्हाचे महापौर विजय मोरे यांना काळे फासून अपमान झाला होता. त्यानंतर महापालिका बरखास्त करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सरकारनं बरखास्तीचा आदेश देऊन मराठी भाषकांवर दडपशाही केलीय.
 
 

First Published: Thursday, December 15, 2011, 13:50


comments powered by Disqus