Last Updated: Thursday, July 26, 2012, 11:54
www.24taas.com, नवी दिल्ली‘गुजरात दंगलीसाठी मी दोषी असेल तर मला फासावर चढवा’, असं वक्तव्य केलंय गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी. एका वर्तमानपत्राला मुलाखत देत असताना मोदींनी हे वक्तव्य केलंय.
‘नई दुनिया’ नावाच्या एका ऊर्दु साप्ताहिकाशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगलीसाठी दोषी असेन तर सुळावर चढवा असं म्हटलंय. मोदींची मुलाखत ही या साप्ताहिकासाठी मुखपृष्ठावरची मुलाखत ठरलीय. नई दुनियाचे संपादक आणि समाजवादी पार्टीचे राज्यसभा सदस्य शाहिद सिद्दीकी यांनी नरेंद्र मोदींची ही मुलाखत घेतलीय. पण, समाजवादी पार्टीचा या मुलाखतीशी काहीही संबंध नसल्याचं सिद्दीकी यांनी सांगितलंय.
गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगली, गुजरातमध्ये मुस्लिमांची दशा आणि आणखी असेच काही संवेदनशील मुद्यांवर सिद्दीकी यांनी मोदींना प्रश्न विचारले. मोदींचे विचारांमध्ये झालेले बदल जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता होती. बॉलिवूडच्या दोन व्यक्तींसोबत भोजन करत असताना मला ही कल्पना सुचली, असं सिद्दीकी यांनी स्पष्ट केलंय. ही कल्पना सुचली तेव्हा सिद्दीकी महेश भट्ट आणि सलीम खान यांच्यासोबत भोजन करत होते. गुजरात दंग्यांवर आधारित मुद्यांवर ही मुलाखत होती आणि तरीही या विषयावर बोलण्यासाठी मोदी तयार झाले, यावर तर माझा प्रथम विश्वासच बसला नाही, असं सिद्दीकी म्हटलंय.
राजकीय विश्लेषकांचं मत मात्र थोडं वेगळं आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन आपली प्रतिमा सुधारण्याचे मोदींचे हे प्रयत्न असल्याचं अनेकांना वाटतंय. कारण, याआधी कधीच मोदींनी गुजरात दंग्यांवर आपलं तोंड उघडलं नव्हतं.
.
First Published: Thursday, July 26, 2012, 11:54