किरण ठाकूरांचा खेद, माफी मागण्यास नकार - Marathi News 24taas.com

किरण ठाकूरांचा खेद, माफी मागण्यास नकार

www.24taas.com, बेळगाव
 
बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्याविरोधात कर्नाटक विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. याप्रकरणी विधिमंडळात उपस्थित राहून किरण ठाकूर यांनी खेद व्यक्त केला परंतु त्यांनी माफी मागण्यास नकार दिला.
 
तरुण भारत वर्तमानपत्रातल्या कर्नाटक सरकारविरोधी लिखाणाबाबत संपादक किरण ठाकूरांविरोधात हा हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामुळे त्यांना आज विधानभवनात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तर दैनिक तरुण भारतची मान्यता रद्द करण्यासंदर्भात प्रेस काउन्सिलकडे शिफारस करण्याचाही ठराव करण्यात आला होता.
 
बेळगावचे आमदार अभय पाटील आणि आमदार शाम घाटगे यांनी तरूण भारतमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांविरोधात हक्कभग समितीकडे तक्रार केली होती. त्यामुळे कर्नाटक सरकारविरोधात वृत्तपत्रामध्ये मजकूर आल्याप्रकरणी ठाकूर यांना हक्कभंगाची नोटीस धाडण्यात आली होती. त्यानुसार किरण ठाकूर विधासभेमध्ये हजर झाले.
 
याबाबत त्यांनी यापूर्वीच आपण माफी मागणार नसल्याचं आपल्या दैनिकातून सांगितलं होतं.  दरम्यान, किरण ठाकूर यांच्यावर कर्नाटक सरकारने कारवाईचा घाट घातल्याच्या निषेधार्थ,  बेळगावातल्या अन्याय निवारण संघर्ष कृती समितीच्या वतीनं आज भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येनं मराठी भाषिक सहभागी झाले.

First Published: Monday, July 30, 2012, 22:20


comments powered by Disqus