सुशीलकुमार होणार देशाचे गृहमंत्री? - Marathi News 24taas.com

सुशीलकुमार होणार देशाचे गृहमंत्री?

www.24taas.com, नवी दिल्ली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहेत. केंद्रीय अर्थमंत्रिपदी चिदम्बरम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर गृहमंत्रिपदावर सध्याचे ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे विराजमान होण्याची चिन्ह दिसत आहेत. प्रणव मुखर्जी  राष्ट्रपतीपदी निवडून आल्यामुळं अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार पंतप्रधानांकडेच आहे.
 
मुखर्जींनंतर या पदाचा कार्यभार चिदम्बरम यांच्याकडं सोपवण्याची स्वत: पंतप्रधानांचीच इच्छा आहे. तर चिदम्बरम यांची अर्थमंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर त्यांच्या गृहखात्याची जबाबदारी सुशीलकुमार शिंदेंकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुखर्जींच्या राष्ट्रपती होण्यानं लोकसभा नेतेपदही रिक्त आहे. आठ ऑगस्टपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन असल्यानं लोकसभा नेतेपदावर तातडीनं नियुक्ती करणं गरजेचं आहे.
 
त्यामुळं या पदावर शिंदेचीच निवड होण्याचं चित्र सध्या दिसतं आहे. पण आदर्श घोटाळ्यामुळं शिंदेंच्या मार्गात अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढच्या अडचणी टाळण्यासाठी पंतप्रधान  गृहमंत्रिपदासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नावासाठी आग्रही आहेत.
 
 
 

First Published: Tuesday, July 31, 2012, 12:34


comments powered by Disqus