उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू - Marathi News 24taas.com

उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू

www.24taas.com, नवी दिल्ली
 
बातमी निसर्गाच्या कहराची. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.
 
ढग फुटल्यामुळे भागीरथी नदीला पूर आलाय़. त्या पुरामध्ये जवळपास दीडशे घरं आणि बरीच वाहनं वाहून गेलीयत. एक पूलही तुटलाय. काही लोकही या पुरात वाहून गेल्याची भीती आहे. प्रचंड पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे जम्मू-श्रीनगर हायवे बंद करण्यात आलाय.
 
बचावकार्य वेगानं सुरू आहे. पण पाऊस, दरड आणि नद्यांना आलेला पूर यामुळे बचावकार्यात अडथळे येताय. तर दुसरीकडे मनालीमध्येही ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू झालाय. माती खचल्यामुळे मनाली-रोहतांग-लेह हायवे बंद झालाय.
 
उत्तर आणि पूर्व भारतात पावसाने व पूराने थैमान घातले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश यानंतर आता उत्तराखंड राज्यात निसर्गाने कोप सुरु केला आहे. स्वर्णघाट आणि संगमचट्टी भागात १२ लोक वाहून गेले. यात फायर ब्रिगेडचे तीन जवानांचा समावेश आहे.
 
अस्मीगंगा आणि भागीरथी नदीला पूर आला आहे. या भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच या परिसरातील लोकांना पूरग्रस्त स्थितीतून बाहेर काढण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग ५८ हा बंद आहे. उत्तरकाशीमध्ये वीज गायब असून, टेलिफोन लाइन बंद पडल्या आहेत. त्यामुळे संपर्क करणे कठीण होत आहे. दळणवळणावर याचा परिणाम दिसून येत आहे.

First Published: Saturday, August 4, 2012, 16:56


comments powered by Disqus