निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ? - Marathi News 24taas.com

निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ?

झी २४ वेब टीम, नवी दिल्ली
 
निवडणूक आयोग पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या  विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.
 
 
उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत पाच टप्प्यात  निवडणुका होतील अशी शक्यता आहे. इतर चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक  आयुक्त एस.वाय.कुरेशी या संबंधी घोषणा करतील आणि त्यानंतर या पाच राज्यांमध्ये आचार संहिता लागू होईल.
 
निवडणूक आयोगाने पुढच्या वर्षी निवडणुका घेण्या अगोदर या राज्यांमध्ये तयारीचा तसेच राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी तीव्र आंदोलनानंतर पहिल्यांदाच पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचारा पायबंद घालण्यात अपयशी ठरलेल्या केंद्रातील काँग्रेस प्रणीत युपीए सरकारला लक्ष्य केलं आहे. अण्णा हजारेंनी आपल्या  टीमसह या सर्व राज्यां मध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचार करु असं जाहीर केलं आहे. काल संसदेत मांडण्यात आलेले लोकपाल विधेयक टीम अण्णांनी फेटाळलं आहे.
 
२०१४ साली होणाऱ्या देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुक एक प्रकारे रंगीत तालमी आहे असं मानण्यात येत आहे. सगळ्या देशाचं लक्षं उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांकडे लागलं आहे. उत्तर प्रदेशात मायावतींची बसपा, मुलायम सिंगांचे सपा, काँग्रेस आणि भाजपा अशी बहुरंगी लढत रंगणार आहे.
 
काँग्रेसचे महासचिव राहुल गांधींनी मायावतींच्या सरकारच्या कारभारावर तुफानी हल्ला चढवला असल्याने उत्तर प्रदेशात निकराचा सामना रंगेल. उत्तर प्रदेशाच्या निवडणूक निकालांवर मायावती, मुलायम सिंग राहूल गांधी आणि नितीन गडकरी अशा दिग्गजांचे भवितव्य अवलंबून आहे.

First Published: Saturday, December 24, 2011, 16:22


comments powered by Disqus