Last Updated: Monday, December 26, 2011, 17:16
झी २४ तास वेब टीम, पुणे अण्णा हजारेंच्या आंदोलनावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आसूड ओढले आहेत. देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे अस्थिरता माजेल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अण्णा हजारे उद्यापासून तीन दिवस मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. तसंच त्यानंतर 30 तारखेला ते दिल्लीतही सोनिया गांधींच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं.
मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानाच्या भाड्यात सवलत मिळावी यासाठी जागृती मंच या संस्थेने याचिका दाखल केली होती तेंव्हाही न्यायालयाने अण्णांना फटकालं होतं. संसदेत विधेयकावर चर्चा सुरु असताना आंदोलन कशासाठी असा सवालच न्यायालयाने विचारला होता.
गेल्या काही दिवसात अण्णा हजारेंच्या आंदोलना संदर्भात अनेक वादंगांना तोंड फूटलं आहे. कालच त्यांचा आणि नानाजी देशमुखांचे छायाचित्र एका वर्तमानपत्राने छापलं होतं. अण्णांचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीच अण्णांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.
First Published: Monday, December 26, 2011, 17:16