लोकपाल विधेयकावर विरोधक आक्रमक - Marathi News 24taas.com

लोकपाल विधेयकावर विरोधक आक्रमक

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आजपासून संसदेत तीन दिवस चर्चा होणार आहे. या विधेयकामधल्या तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
 
सरकारने अण्णांच्या चारही मागण्या फेटाळल्यात.  सरकारकडून लोकपाल बिलात दुरुस्ती करण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र व्हिसल ब्लोअर आणि न्यायालयीन उत्तरदायित्व बिलावर सरकारकडून विचार होण्याची शक्यता  वर्तवली जातेय. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग सरकारची भूमिका संसदेत मांडणार आहेत. काँग्रेसकडून संसदेत आज शशी थरुर पहिले वक्ते असतील.
 
दुसरीकडे भाजपनं विधेयकांमध्ये काही दुरुस्ती सुचवल्यात. सशक्त लोकपालसाठी आम्ही सुचवलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्याच पाहिजेत अशी भूमिका भाजपनं घेतलीय. डाव्या पक्षांनी काही दुरुस्त्या सुचवल्यात. निरीक्षकांच्या मते लोकसभेत संमती मिळवणं सरकारला फारसं कठीण जाणार नाही. मात्र राज्यसभेत सरकारला विरोधकांना विश्वासात घ्यावं लागेल. विधेयक संमत होण्यासाठी विरोधकांनी दुरुस्ती न सुचवता सहकार्य करावं असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी केलंय.
 
 

First Published: Tuesday, December 27, 2011, 12:13


comments powered by Disqus