धीरुभाई अंबानींच्या स्मारकाचे अनावरण - Marathi News 24taas.com

धीरुभाई अंबानींच्या स्मारकाचे अनावरण

 झी २४ तास वेब टीम, चोरवाड (गुजरात)
 
रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानींच्या स्मारकाचे उदघाटन जूनागढ जिल्ह्यातील चोरवाडमध्ये करण्यात आलं आहे. यावेळेस संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित होतं. अंबानी कुटुंबाचे अध्यात्मिक गुरु रमेश भाई ओझा यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आलं. या प्रसंगी कोकिळाबेन अंबानी, मुकेश आणि अनिल अंबानी तसंच दोन्ही मुली दीप्ति साळगावकर आणि नीना कोठारी आणि अंबानी कुटुंबाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
 
मुकेश आणि अनिल अंबानी उद्योगसमुहाच्या विभाजनानंतर रिलायन्सचे संस्थापक धीरुभाई अंबानींच्या स्मारकाच्या उदघाटन समारंभात एकत्र दिसले. चोरवाड हे धीरुभाईंचे जन्मगाव आणि त्यांचे लहानपण तिथेच गेलं. धीरुभाई अंबानींचे २००२ साली निधन झालं आणि त्यानंतर काही वर्षातच अंबानी बंधु विभक्त झाले. अंबानींच्या विभागाजनाच्या वेळेस दोघांनीही एकमेकांवर आरोप केले होते. अंबानी कुटुंबांच्या जवळच्या सूत्रांनुसार जवळपास पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच कौटुंबिक समारंभाचे आयोजन करण्यात आलं. याआधी १९९६ साली धीरुभाई अंबानींनी आपल्या गावकऱ्यांसाठी भव्य भोजनाचे आयोजन केलं होतं. अंबानी कुटुंब धीरुभाईंच्या स्मारकाच्या उदघाटन प्रसंगी भावनाविवश झाल्याचं रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष (ग्रुप प्रेसिडेंट) यांनी सांगितलं.
 
धीरुभाईंचे स्मारक त्याच ठिकाणी उभारण्यात आलं आहे जिथे त्यांचे लहानपण गेलं आणि व्यावसायिक जीवनाची सुरवात केली. धीरूभाई ‘मंगारोलवालो डेला’ नावाच्या बंगल्यात भाड्याने राहत होते. धीरुभाईंनी २००२ साली बंगला खरेदी केला आणि त्याचं नाव ‘धीरुभाईनो डेला’ असं ठेवले. स्मारकाचा विस्तार तीन दालनांमध्ये करण्यात आला आहे पहिल्यात छायाचित्रांचे प्रदर्शन, दुसऱ्यात धीरुभाईंचे जूने राहण्याचे निवासस्थान आणि तिसऱ्यात सभागृह आहे. ऑडिटोरियममध्ये त्यांच्या जीवनावर आधारीत एक लघु फिल्म दाखवण्यात येईल.
 

First Published: Wednesday, December 28, 2011, 20:06


comments powered by Disqus