टीम अण्णा काँग्रेसला करणार नाही टार्गेट - Marathi News 24taas.com

टीम अण्णा काँग्रेसला करणार नाही टार्गेट

www.24taas.com, मुंबई 
 
अण्णा हजारेंनी आंदोलनाला झपाट्याने कमी होणार लोकांचा पाठिंबा आणि मागील चुकांपासून बोध घेत जाहीर केलं आहे कि टीम अण्णा पाच राज्यांमध्ये काँग्रेस सरकारला लक्ष्य करणार नाही. टीम अण्णा विधानसभा निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये फक्त सशक्त लोकपाल विधेयकासाठी मोहीम हाती घेणार आहे. लोकांमध्ये लोकपाल विधेयकासाठी जागृती घडवून आणण्यासाठी टीम अण्णा पाच राज्यांमध्ये दौरा करणार आहे.
 
अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं कि कोअर कमिटीच्या बैठकीत लोकपालसाठी जागृती मोहीम राबवताना कोणत्याही राजकीय पक्षाला लक्ष्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णा हजारे या राज्यांमध्ये दौरा करणार आहेत का असं विचारला असता अण्णांची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते लोकपालच्या मोहीमेत सहभागी होतील असं केजरीवाल यांनी सांगितलं. काँग्रेस विरोधातल्या आक्रमक भूमिकेमुळे टीम अण्णांना फटका बसल्याचा इनकार करताना केजरीवाल म्हणाले की आम्ही कधीच काँग्रेस पक्ष विरोधक नव्हतो.
 
गाझियाबादमध्ये टीम अण्णांच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेणं तसंच कोणत्याही राजकीय पक्षाला टार्गेट न करता लोकपालच्या मुद्दावर दबाव कसा निर्माण करता येईल यासाठी रणनिती निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. अण्णा हजारेंच्या उपोषणाला आणि आंदोलनाला मुंबई आणि दिल्लीत मिळालेला अत्यल्प प्रतिसाद आणि काँग्रेस विरोधी भूमिकेमुळे टीम अण्णाला टीकेच्या भडिमाराला तोंड द्यावं लागलं. अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी आज अण्णा हजारेंची भेट घेऊन गाझियाबादला बैठकीत झालेल्या निर्णयांची कल्पना दिली.
 
 

First Published: Tuesday, January 10, 2012, 22:16


comments powered by Disqus