Last Updated: Thursday, February 16, 2012, 20:39
www.24taas.com, कन्याकुमारी केरळच्या समुद्रात काल रात्री इटलीच्या एन्रिको लेक्सी या जहाजावरील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात, दोन भारतीय मच्छीमार ठार झाले आहेत.
केरळमधील अलपुझ्झाजवळ समुद्रातून इटलीचे हे जहाज जात असताना हा प्रकार घडला. रोजच्याप्रमाणे तमिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील नींदकारा येथील काही मच्छीमार आपल्या छोट्या बोटींमधून मासे पकडण्यासाठी गेले होते. रात्रीच्या अंधारात हे मच्छीमार समुद्री चाचे असल्याचा संशय आल्यानंतर, एन्रिको लेक्सी बोटीवरील सुरक्षा रक्षकांनी गोळीबार सुरू केला. छोट्या बोटीतून आलेले हे मच्छीमार चाचे असल्याच्या संशयातून हा गोळीबार करण्यात आल्याचा दावा, एन्रिको लेक्सी या जहाजाच्या कप्तानाने केल्याचे केरळ पोलिसांनी सांगितले.
एन्रिको लेक्सीच्या कप्तानाच्या लक्षात ही चूक लक्षात आल्यानंतर त्याने संबंधित भारतीय अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर किनारा रक्षक दलाचे 'सुमार' आणि 'लक्ष्मीबाई' या दोन गस्ती नौका आणि एक विमान, एन्रिको लेक्सी या जहाजाचा माग घेण्यासाठी पाठविण्यात आले.भारतीय नौदलाचे 'आयएनएस काबरा' हे जहाजही कामगिरीवर धाडण्यात आले.
First Published: Thursday, February 16, 2012, 20:39