देशव्यापी संप, पण मुंबई थांबली नाहीच - Marathi News 24taas.com

देशव्यापी संप, पण मुंबई थांबली नाहीच

www.24taas.com, नवी दिल्ली
 
बेरोजगारी आणि खासगीकरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सुरुवात झाली आहे. या संपात केंद्र सरकारच्या विविध उपक्रमातील संस्थांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. या संपात देशातील ११ मोठ्या आणि पाच हजार लहान युनियन सहभागी झाल्या आहेत.
 
डाव्या उजव्या विचारसरणीच्या सगळ्याच संघटना संपात सहभागी झाल्यानं देशातील अनेक राज्यांतील जनजिवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू या राज्यांत संपाचा विशेष परिणाम जाणवणार आहे. शिवाय देशातल्या राष्ट्रीय बँकांतील बहुतांश युनियन संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळं आज बँकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत.
 
दुसरीकडं मुंबईतलं जनजीवन सुरळीत आहे. महापालिकेतल्या कर्मचारी संघटनांनी संपाला पाठिंबा दर्शवला आहे, मात्र  परीक्षांमुळं संपात सहभागी होणार नाहीत. तसंच महापालिका प्रशासनानंही कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होऊ नये असं आवाहन करणारं पत्रक काढलं आहे. सकाळपासून मुंबईतलं जनजीवन सुरळीत सुरु आहे. उपनगरीय़ रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. शिवाय टॅक्सी आणि बेस्ट सेवाही सुरळीत आहे.
 
 

First Published: Tuesday, February 28, 2012, 10:35


comments powered by Disqus