संपाने केले १० हजार कोटींचे नुकसान - Marathi News 24taas.com

संपाने केले १० हजार कोटींचे नुकसान

www.24taas.com, मुंबई/नवी दिल्ली
 
 
अनेक  प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी  पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. मात्र, या संपामुळे १० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. तर संपादरम्यान, मुंबईतील सर्व राष्ट्रीय बँका जवळपास बंद होत्या. तर काही ठिकाणी दुपारपासून एटीएम मधील पैसे संपले होते. संपामुळे चेक क्लिअरिंगची यंत्रणा बंद असल्याने १0 कोटीहून अधिकचे व्यवहार ठप्प झाले होते.
 
 
मुंबईत कॉफर्ड मार्केट परीसरातील बँक बंद असल्याकारणाने बहुतेक दुकानदारांनी आज मार्केट मध्ये येण्यास नापसंती दर्शविली. परिणामी ७५टक्के ग्राहक कमी आले होते. दरम्यान,  शरद राव यांच्या संघटनेने संपाला बाहेरून पाठिंबा दिल्याने टॅक्सी, रिक्षा सेवा सुरळीत होत्या.  कामगारांनी आझाद मैदानात एकत्र येवून संपाला पाठिंबा दर्शविला. प्रमुख बँका आणि टपाल सेवा पुर्णपणे बंद होती त्याचा त्रास सोडला तर संपाचा मुंबईच्या जनजीवनावर फारसा झाला नाही. दिवसभर लोकल रेल्वे वेळेवर होती तर बेस्टची बससेवाही दिवसभर सुरळीत होती.
 
 
संपामध्ये ५0 कोटींपेक्षा जास्त कामगारांनी सक्रिय पाठिंबा दिला असला, तरी संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पश्‍चिम बंगाल, केरळ, ओडिशा, त्रिपुरा, आसाम, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असले तरी राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई या महानगरांमध्ये मात्र संपाचा कुठलाही प्रभाव जाणवला नाही. संपकाळात कुठेही हिंसाचार झाला नाही. मुंबईसह महाराष्ट्रात या संपाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे येथील जनजीवन सुरळीत होते.
 
 
या संपात देशभरातील १0 लाख बँक कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे बँकांचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. अनेक ठिकाणी सकाळी १२ नंतर एटीएममध्ये ठणठणाट होता. परिणामी, लोकांचे हाल झालेत.   देशातील प्रमुख बंदरांतील एक लाख गोदी कामगारांनी प्रथमच या देशव्यापी संपात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. मुंबई, जेएनपीटी या बंदरांतील आयात-निर्यात मालाची चढ-उतार कामावर परिणाम झाला होता.
 

First Published: Wednesday, February 29, 2012, 09:15


comments powered by Disqus