कृपांबाबत काँग्रेसचे तोंडावर बोट - Marathi News 24taas.com

कृपांबाबत काँग्रेसचे तोंडावर बोट

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल कॉंग्रेसने कायदा आपले काम करेल, एवढीच प्रतिक्रिया देऊन तोंडावर बोट ठेवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहार प्रकरणी खासदार सुरेश कलमाडी यांच्याप्रमाणेच कृपाशंकर सिंह यांच्यावरही निलंबनाची कारवाई होईल काय, या प्रश्‍नावर मात्र कॉंग्रेसने बोलणे टाळले आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंध आल्याच्या आरोपांमुळे वर्षभरापूर्वी कृपाशंकर सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांची त्याच वेळी उचलबांगडी होणार असल्याची अटकळही बांधली जात होती. मात्र, पुढे काहीत झाले नाही.  मुंबई उच्च न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांच्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पुन्हा कृपा चर्चेत आले.
 
 
मुंबई  पालिका निवडणुकीतील पराभवाचे निमित्त करून कृपाशंकर यांनी विभागीय अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु त्यांना दिलासा मिळाला नाही.  कृपाशंकर यांच्यावर छापे पडले असले तरी तपास यंत्रणा किंवा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेले नाही,  असे कॉंग्रेस प्रवक्ते रशीद अल्वी यांनी सांगून अधिक बोलण्याचे टाळले.  याचाच अर्थ की, काँग्रेस त्यांना पाठिशी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  अल्वी यांच्यावर प्रश्नांची सरबती झाल्याने ते म्हणाले, कृपांबाबत पक्षाचे काम सुरू आहे. याबाबत निर्णय झाल्यास आपल्याला कळविले जाईल.

First Published: Saturday, March 3, 2012, 10:44


comments powered by Disqus