Last Updated: Tuesday, March 6, 2012, 19:25
www.24taas.com, नवी दिल्ली 
निवडणुका संपताच आता महागाईचे चटके बसण्याची चिन्हं आहेत. पेट्रोलमध्ये पाच रुपये वाढ करण्याची मागणी पेट्रोल कंपन्यांनी केली आहे. पेट्रोलमध्ये दरवाढ केली जावी यासाठी सातत्याने पेट्रोल कंपन्या मागण्या करीत आहेत. मात्र निवडणूका तोंडावर असल्याने गेल्या काही महिन्यात ही वाढ झाली नव्हती मात्र आज पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती येताच पुन्हा एकदा पेट्रोलमध्ये वाढ होणार असं समजते आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलचे वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही काळात पेट्रोल लिटरमागे चार तर डिझेलमध्ये दोन रुपयांनी पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
पेट्रोलचे दर गेल्या तीन महिन्यांपासून वाढलेले नाहीत. या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाच राज्य तसेच महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकांमुळे सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढविले नाहीत. परंतु, आता पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील निवडणुंकांचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतरच पेट्रोल दरवाढीचा विचार करावा, अशी केंद्र सरकारने केलेल्या विनंतीनंतर ही दरवाढ लांबणीवर टाकल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
First Published: Tuesday, March 6, 2012, 19:25