ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांना निर्वाणीचा इशारा - Marathi News 24taas.com

ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांना निर्वाणीचा इशारा

 
तृणमुल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जींनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी २४ तासांची अंतिम मुदत दिली आहे. त्रिवेदींची हकालपट्टी न केल्यास पाठिंब्याबाबत फेरविचार करु असा निर्वाणीचा इशारा ममता बॅनर्जींनी दिला आहे.
 
त्रिवेदींना मंत्रिमंडळातून काढण्याच्या मागणीवर ठाम राहत ममता बॅनर्जींनी त्यांच्या जागी मुकुल रॉय यांची नियुक्ती करण्याच्या विनंतीवर कार्यवाही करण्याची वेळ आल्याचं सांगितलं आहे. मला जे काही सांगायचं आहे ते मी सांगितलं असून आता सरकारने त्यावर निर्णय घ्यायचा आहे. रेल्वेमंत्री म्हणून मुकुल रॉय यांच्या नावाची शिफारस केली असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
 
दरम्यान त्रिवेदींनीही आता आक्रमक होत रेल्वे मंत्रालय ही कुणाचीही खाजगी मालमत्ता नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्रिवेदींनी ममता बॅनर्जींना आव्हान देत राजीनामा देण्याचा आदेश लेखी स्वरुपात द्यावा असं ठणकावलं आहे. तृणमुल काँग्रेसचे लोकसभेतील चीफ व्हीप कल्याण बॅनर्जी यांनी त्रिवेदी यांना दूरध्वनीवरुन हकालपट्टी होण्याची वाट न पाहता सन्मानाने राजीनामा देण्यास बजावल्यानंतर त्रिवेदींनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींनी रेल्वे अर्थसंकल्पात भाडेवाढ केल्यानंतर ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आणि त्यांनी भाडेवाढ मागे घेण्यात यावी तसंच दिनेश त्रिवेदींना जबाबदारी मुक्त करावं अशी मागणी पंतप्रधानांकडे केली होती. आता हा पेच आणखीनच गंभीर झाला आहे.
 

First Published: Sunday, March 18, 2012, 14:40


comments powered by Disqus