Last Updated: Sunday, November 13, 2011, 15:08
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरना यांच्या समर्थकांनी मथुरादास माथूर रुग्णालयाच्या बाहेर पत्रकारांवर हल्ला चढवला. मदेरना हे परिचारिका भँवरी देवी यांच्या अपहरण आणि खुनाची शक्यता केल्याच्या प्रकरणातील आरोपी आहेत.
मदेरना यांच्या समर्थकांनी रुग्णालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या बातमीदार आणि कॅमेरामन यांना धक्काबुक्की केली तसंच कॅमेरा, माईक आणि ओबी वॅन तसंच गाड्यांचे नुकसान केलं. मदेरना यांची मुलगी दिव्या मदेरना यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना मदेरनांच्या २०-२५ समर्थकांनी पत्रकारांवर हल्ला चढवला. या झटापटीत दोघांना किरकोळ जखमा झाल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या घटनेनंतर रुग्णालयाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मदेरना यांच्या पत्नी लिला मदेरना यांनी प्रसार माध्यमं त्यांच्या पतीला लक्ष्य करत असल्याचं तसंच मदेरना आणि भँवरीदेवींच्या वादग्रस्त सीडीचा उपयोग त्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी त्यांचे राजकीय विरोधक करत असल्याचा आरोप केला. माझे पती निर्दोष असून यामागे राजकीय कटकारस्थान असल्याचं आरोप लिला मदेरना यांना केला.
मदेरना यांनी सीबीआय चौकशी टाळण्यासाठी छातीत दुखत असल्याच्या कारणावरुन स्वत:ला रुग्णालयाता दाखल करुन घेतलं. मदेरना यांची राजस्थानच्या मंत्रिमंडळातून आधीच हकालपट्टी करण्यात आली आहे आणि काल काँग्रेस पक्षाने काल त्यांना पक्षातून निलंबीत केलं.
First Published: Sunday, November 13, 2011, 15:08