अर्थमंत्र्यांशी चर्चा निष्फळ, सराफांचा संप सुरूच - Marathi News 24taas.com

अर्थमंत्र्यांशी चर्चा निष्फळ, सराफांचा संप सुरूच

www.24taas.com, नवी दिल्ली
 
सोन्यावरच्या आयात आणि सेवा कराच्या निषेधार्थ  सराफा व्यापाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. सराफा व्यापाऱ्यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. पण या चर्चेत  कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप सुरूच राहणार आहे. १७ मार्चपासून हा संप सुरू आहे. देशभर पुकारलेल्या या संपामुळे सुमारे २० हजार कोटींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय.
 

राज्यातही सोन्यावरील सेवा  आणि आयात कर हटवण्यासाठी सराफा व्यापारी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी राज्यातल्या सराफा व्यापारीही रस्त्यावर उतरले आहेत. अकोल्यात रेलरोको केला, तर साताऱ्यात मुंडण आंदोलन करण्यात आलंय.
 
अकोल्यात सराफा व्यापा-यांनी रेल रोको आंदोलन केलंय. सोन्यावरील सेवा कर आणि आयात कर हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. अकोला रेल्वे स्टेशनवर अकोला काचीपुरा एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास अडवून धरली. अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळं पोलीस आणि रेल्वे प्रशानाची चांगलीच तारांबळ उडाली. अकोला पूर्णा रेल्वे मार्गावर जास्त रेल्वे वाहतूक नसल्यानं या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर जास्त परिणाम जाणवला नाही. पोलिसांनी ७० ते ८० आंदोलकांना ताब्यात घेतलंय.
 
केंद्र सरकारनं सोन्यावर सेवा  आणि आयात करात वाढ केल्याच्या निषेधार्थ गेल्या बावीस दिवसांपासून देशभरातल्या सराफा व्यापा-यांनी संप पुकारला असून आंदोलन सुरू केलंय.  सराफा व्यापा-यांनी केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी विविध मार्गांनी आंदोलन सुरू केलंय.
 

First Published: Friday, April 6, 2012, 16:01


comments powered by Disqus