Last Updated: Tuesday, April 10, 2012, 09:05
www.24taas.com, पटना १५ एप्रिल रोजी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'बिहार दिन' कार्यक्रमाला आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असे दंड आता नव्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी थोपटले आहेत. त्यामुळे ज्याला काही सन साजरे किंवा दिन साजरे करायचे आहेत, ते त्यांनी आपल्या राज्यात साजरे करावेत, महाराष्ट्रात येऊन त्याचे राजकारण करू नये, गाठ माझ्याशी आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी दिले होते. त्यामुळे कडवा विरोध दर्शविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नीतिशकुमार यांनी खुले आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार म्हणाले, मुंबईत येण्यापासून आपणास कोणी रोखू शकत नाही. मुंबईत येण्यासाठी आपणास व्हिसाची आवश्यकता नाही, या कार्यक्रमास आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहणारच. महाराष्ट्रात साजरा होईल तो महाराष्ट्र दिनच, असेही स्पष्ट केले. मुंबईला जाण्यास कोणताही अडथळा नाही. मी देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतो. त्यासाठी मला व्हिसाची गरज नाही. 'बिहार दिन' कार्यक्रमास उपस्थित राहून आपण तेथे राहणाऱ्या बिहारी जनतेला संदेश देणार आहे, असे नितीशकुमार म्हणालेत. त्यामुळे पुन्हा बिहारी राग आळवल्याचे दिसून येत आहे.
'बिहार दिन' कार्यक्रमास आपला विरोध असल्याचे मनसेने अधिकृतरीत्या जाहीर केले नसले, तरी मनसेच्या काही नेत्यांनी मात्र 'बिहार दिन' सोहळ्याविरोधात माध्यमांतून तीव्र मतप्रदर्शन केले आहे. दरम्यान, नीतिशकुमार यांच्या या आव्हानाने मनसेला चांगलेच धर्मसंकटात टाकल्याचे दिसत आहे. राज ठाकरे येत्या १२ तारखेला मालेगावमध्ये सभा घेणार आहेत. त्यावेळी ते या प्रकरणी आपली भूमिका जाहीर करतील, असे मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा वादाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. हा वाद मुद्दाम उकरून काढला जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
First Published: Tuesday, April 10, 2012, 09:05