राष्ट्रपतींचा बंगला वादाच्या भोव-यात - Marathi News 24taas.com

राष्ट्रपतींचा बंगला वादाच्या भोव-यात

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासाठी पुण्यात बांधण्यात येत असलेला बंगला पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. या बंगल्यासाठी नियमापेक्षा अधिक जागा देण्यात आल्याचा आरोप जस्टीस फॉर जवान या संस्थेनं केलाय. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे.
 
 
लष्कराने पुण्यातील खडकी येथील कॅन्टॉन्मेंट भागात २६,१०० चौरस फूट जागा दिली आहे. जुलै २०१२ मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची मुदत संपल्यानंतर त्या पुण्यात स्थायिक होणार आहे.   त्यांच्यासाठी संरक्षण खात्यातर्फे हा बंगला बांधला जातोय. खडकीमध्ये २ लाख ६१ हजार चौरस फुटांच्या भूखंडावर हा बंगला उभा राहत आहे.
 
 
मात्र राष्ट्रपतीच्या बंगल्यासाठी एवढा मोठा भूखंड देणं नियमबाह्य असल्याचं जस्टीस फॉर जवान संस्थेनं म्हटल आहे. नियमानुसार राष्ट्रपतींसाठी २ हजार चौरस फुटांचा फ्लॅट किंवा ४ हजार ४९८  चौरस फुटांचा बंगला देण्यात येतो. राष्ट्रपतींना मात्र अडीच लाख चौरस फुटांचा भूखंड देण्यात आलाय. त्यामुळेच हा बंगला वादाच्या भोव-यात सापडलाय. यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं जस्टीस फॉर जवाननं म्हटल आहे.
 
 
दरम्यान, एकीकडे लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना घरे बांधण्यासाठी सरकारकडे जमिनीची कमतरता असताना राष्ट्रपतींच्या बंगल्यासाठी जमीन देण्यास माजी सैनिकांनी विरोध केला आहे. नियमानुसार देशाचे राष्ट्रपती ४ हजार ५०० चौरस फूट आकाराचा सरकारी बंगला किंवा सरकारच्या अखत्यारितला २ हजार चौरस फूट आकाराचा बंगला मिळविण्यास पात्र असतात.

First Published: Friday, April 13, 2012, 10:52


comments powered by Disqus