Last Updated: Monday, April 23, 2012, 16:49
www.24taas.com, नवी दिल्ली करोडो भारतीयांना रोज सकाळी उठल्यावर अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे चहा. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यावर किंवा गावोगावी जर एक गोष्ट सहज आढळत असेल, तर ती म्हणजे चहाची टपरी. असा हा देशभरात उत्साह जागवणारा चहा आता अधिकृतरीत्या भारताचं राष्ट्रीय पेय बनणार आहे. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. माँटेकसिंग अहलुवालिया यांनी तशी माहिती दिली आहे.
देशभरातील ८३% कुटुंब सकाळी चहा पिऊनच कामाला लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चहाचं सेवन करणाऱ्या व्यक्तींची संख्या भारतात असल्यामुळे भारताचं राष्ट्रीय पेय म्हणून चहालाच मान्यता मिळाली आहे. पण, यासंदर्भात घोषणा मात्र अजून एक वर्षाने म्हणजे १७ एप्रिल २०१३ रोजी होणार आहे. या दिवशी पहिले भारतीय चहा उत्पादक मणिराम दिवाण यांची दोनशे बारावी जयंती आहे.
आज चहा उत्पादनात भारत अग्रेसर आहे. दार्जिलिंग येथील चहाला जगभरातून मागणी असते. तसाच भारतात औषधी चहाही बनवला जातो. आसाममध्ये चहाचे मोठ्या प्रमाणावर मळे आहेत. १८२६ साली इस्ट इंडिया कंपनीने भारतात चहाच्या लागवडीला सुरूवात केली होती. पण, इंग्रज गेल्यावरही भारतीयांना लागलेली चहाची सवय काही गेली नाही. आज आसाम हे जगातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य आहे. भारतात चहाचे उत्पादनही सर्वप्रथम आसाममध्येच झाले होते. त्यामुळेच चहाला भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून दर्जा देण्यात येणार आहे.
First Published: Monday, April 23, 2012, 16:49