Last Updated: Monday, December 10, 2012, 16:43
www.24taas.com, नवी दिल्ली ‘एफडीआय’मुळे जगातील सर्वप्रथम रिटेल क्षेत्रातील कंपनी ‘वालमार्ट’ भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतात पाऊल ठेवण्याअगोदरच या कंपनीनं आपली पाळमुळं रोवण्याची सुरूवात केलीय. भारतातल्या प्रवेशाच्या लॉबिंगसाठी या कंपनीनं १२५ करोड रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात येतोय. याचसंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आलीय.
भारतीय रिटेल व्यापाऱ्यांच्या संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ‘कॅट’नं आज केंद्र सरकारकडे याबद्दल लोकलेखा समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी केलीय. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे वालमार्टनं अमेरिका संसदेकडे सादर केलेल्या एका अहवालात या लॉबिंगसाठी केलेल्या खर्चाचा उल्लेख केलाय आणि त्यातूनच ही गोष्ट समोर आलीय.
कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी लॉबिंगसाठी खर्च केलेली धनराशीचा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं म्हटलंय. ‘वॉलमार्टनं भारतात लॉबिंगवर मागच्याच वर्षी ६० करोड रुपये खर्च केल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळीही कॅटनं सरकारकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. पण सरकारनं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं’. नुकतीच, सरकारनं एफडीआयद्वारे परदेशी रिटेल कंपन्यांना भारतात कारभार थाटण्याची परवानगी दिलीय.
First Published: Monday, December 10, 2012, 16:43