महिला हेल्पलाईन : कॉल करा `१८१`वर women helpline : call 181

महिला हेल्पलाईन : कॉल करा '१८१'वर

महिला हेल्पलाईन : कॉल करा '१८१'वर
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीत पॅरा मेडिकलच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर सगळा देश सुन्न झाला. राजधानीत महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सामान्य तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले. या जनदबावानंतर दूरसंचार मंत्रालयानं सोमवारी एक महिला हेल्पलाईन नंबर सुरू केलाय.

दूरसंचार मंत्रालयानं अगोदर ‘१६७’ हा तीन अंकांचा नंबर महिला हेल्पलाईन नंबर म्हणून सुरू करण्याची घोषणा केली होती. पण थोड्याच वेळात हा नंबर बदलून ‘१८१’ असा करण्यात आलाय. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी कठिण प्रसंगातील महिलांच्या मदतीसाठी दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांना तीन अंकांचा हेल्पलाईन नंबर सुरू करण्याबाबत विनंती केली होती.

‘अनेकांनी एका अशा नंबरची मागणी केली होती जो लक्षात राहण्यासाठी सोपी असेल. त्यामुळे ‘१८१’ हा नंबर महिला हेल्पलाईन नंबर म्हणून सुरू करण्यात आलाय’, असं दूरसंचार विभागानं म्हटलंय. अगोदर, तीन अंकांचा नंबर उपलब्ध नसल्याचं कारण देणाऱ्या दूरसंचार विभागानं शीला दीक्षित यांच्या मागणीनंतर दोन तासांच्या आत हा नंबरची घोषणा केलीय, हे विशेष. गेल्या दोन वर्षांत दूरसंचार विभागानं पहिल्यांदाच हा तीन अंकांचा नंबर दिलाय.

First Published: Tuesday, December 25, 2012, 10:36


comments powered by Disqus