जेलवर हल्ला; अल कायदाचे ५०० दहशतवादी फरार!, Al Qaeda Militants Flee Iraq Jail in Violent Mass Break-Out

जेलवर हल्ला; अल कायदाचे ५०० दहशतवादी फरार!

जेलवर हल्ला; अल कायदाचे ५०० दहशतवादी फरार!
www.24taas.com, झी मीडिया, बगदाद

इराकमध्ये दहशतवाद्यांनी कुख्यात `अबू गरेब`सहीत दोन जेलवर हल्ला केला. यामुळे जवळजवळ ५०० कैद्यांना फरार होण्याची संधी मिळालीय. यामध्ये `अल कायदा` या दहशतवादी संघटनेचे अनेक वरिष्ठ सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबर झालेल्या चकमकीत आत्तापर्यंत ४० पेक्षा जास्त जण मृत्यूमूखी पडलेत. रात्रभर हे थरारनाट्य रंगलं होतं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे हल्ले उत्तर बगदादच्या ताजी आणि पश्चिम बगदादच्या अबू गरेब भागात सोमवारी रात्री सुरू झाले. हल्लेखोर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एकमेकांवर केलेला गोळीबार जवळजवळ १० तास सुरू होता. जिहादवाद्यांनी ट्विटरसहीत अनेक सोशल वेबसाईटवर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याच्या पोस्ट टाकल्या आहेत.

गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, दोन्ही जेलमध्ये जवळजवळ १०,००० कैदी होती. यातील अबु गरेब जेलमधून जवळजवळ ५०० कैदी फरार होण्यात यशस्वी झालेत. फरार झालेल्यांपैकी अनेक जण दहशतवादाच्या गुन्ह्याखाली अटक झालेले कैदी आहेत. ‘ताजी’ जेलमधल्या कैद्यांना मात्र फरार होण्याची संधी मिळाली नाही.

दहशतवादी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबारात जवळजवळ सुरक्षा दलाचे २० सदस्य मारले गेलेत तर जवळजवळ ४० जण जखमी आहेत. गोळीबारात २१ कैदीही मारले गेलेत तर २५ जण जखमी आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 10:47


comments powered by Disqus