Last Updated: Wednesday, December 18, 2013, 11:47
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली भारताच्या दूतावास अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत मिळालेल्या अत्यंत अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ भारतानंही कधी नव्हे ते अमेरिकेला शिंगावर घेतलंय... खोब्रागडे प्रकरणामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध ताणले गेलेत. अमेरिकेच्या समलैंगिक दूतावास अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केलीय.
भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी असतानाही देवयानी खोब्रागडेंना भररस्त्यात अटक करून, हातात बेड्या घालून पोलीस कोठडीत रवानगी केली गेली. कपडे काढून घेतली देवयानी खोब्रागडेंची अंगझडती घेण्यात आली. दूतावास अधिकारी महिलेसोबत गुन्हेगारांसारखे गैरवर्तन केलं गेलं... ही आहे अमेरिकेची महिलांशी वागण्याची उर्मट पद्धत... तीदेखील भारतीय दूतावासात उपमहावाणिज्यदूत पदावर कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याशी... भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत असलेल्या डॉ. देवयानी खोब्रागडे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असतानाच, न्यूयॉर्क पोलिसांनी त्यांना भररस्त्यात अटक केली. मोलकरणीच्या किरकोळ तक्रारीवरून त्यांच्यासोबत हे अट्टल गुन्हेगारांसारखे गैरवर्तन करण्यात आले. आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती देण्यासाठी देवयानी यांचे वडील व निवृत्त आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली.
याप्रकरणी आता केंद्र सरकारनेही गांभीर्याने लक्ष घातलंय. देवयानी खोब्रागडे यांच्याविरूद्धचा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केलेत. देवयानी खोब्रागडेंना दिलेल्या गैरवर्तणुकीनंतर भारताने अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांना समन्स बजावून ताकीद दिली होती. मात्र, आता अमेरिकेच्या दादागिरीविरोधात भारताने मुहतोड जबाब दिलाय. अमेरिकन खासदारांचे शिष्टमंडळ सध्या भारतात आलंय, परंतु लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी तसेच अन्य राजकीय नेत्यांनीही या शिष्टमंडळाला भेटण्यास ठाम नकार दिला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी अमेरिकी शिष्टमंडळासोबतची बैठकही रद्द केली.
एवढ्यावरच भारत सरकार थांबलेलं नाही. दिल्लीतील अमेरिकन दूतावासाबाहेरचं सुरक्षा बॅरिकेड काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेत. अमेरिकन दूतावास अधिकाऱ्यांना मद्य व अन्य सेवा पुरवण्याबाबतच्या सवलती काढून घेण्यात आल्यात. सर्व अमेरिकन दूतावास अधिकाऱ्यांनी दिलेली ओळखपत्रे मागे घेण्यात आलीत. एवढेच नव्हे तर अमेरिकत दूतावासात काम करणाऱ्या भारतीय नोकरांना किती वेतन दिलं जातं, याचीही माहिती देण्याचे आदेश भारत सरकारनं अमेरिकन अधिकाऱ्यांना दिलेत.
यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह सिने अभिनेता शाहरूख खान यालाही अमेरिकन विमानतळावर वाईट वागणूक देण्यात आली होती. आता तर एका महिला अधिकाऱ्याला अगदी किरकोळ कारणासाठी गुन्हेगारी वागणूक देण्यात आलीय. अमेरिकेचा हा मस्तवालपणा थांबवण्यासाठी भारत सरकारने आणखी मुसक्या आवळण्याची गरज आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 18, 2013, 11:02